मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी युवक ताब्यात

सावंतवाडी तालुक्यातील घटना; सायबर कायद्यांतर्गत युवकावर गुन्हा

सावंतवाडी : एका धक्कादायक घटनेत, सावंतवाडी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने प्रतीक दिनानाथ गावकर (२८, रा. मळगाव गावकरवाडी) याला एका मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल करून तिची बदनामी केल्याप्रकरणी सोमवारी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीने मे महिन्यात याविरोधात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर गावकरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रतीक गावकर याने सोशल मीडियावर एका मुलीचे फोटो अश्लील पद्धतीने पोस्ट करून तिची बदनामी केली होती. हा प्रकार मे महिन्यात उघडकीस आला, त्यानंतर पीडितेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीनुसार, संशयित युवकावर सायबर कायदा आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांना सायबर सेलची मदत घ्यावी लागली. संशयित प्रतीक गावकर हा कामानिमित्त मुंबईत राहत असे आणि मळगाव येथील आपल्या घरी ये-जा करत असे. सोमवारी तो आपल्या घरी आल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान, संशयिताने आपला गुन्हा कबूल केला आहे. मात्र, त्याने हे कृत्य का केले, याबाबतची माहिती त्याने अद्याप पोलिसांना दिलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी माधुरी मुळीक करत आहेत. मंगळवारी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!