पालकमंत्री नितेश राणे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात
मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी मालवणनजीक समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘संगम’ ही बिगर यांत्रिक नौका उलटून एक मच्छिमार बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्री. जितेश वाघ (रा. मेढा जोशीवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे बेपत्ता झालेल्या मच्छिमाराचे नाव आहे. या घटनेनंतर तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली असून, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने जितेश वाघ यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी ६.०० वाजताच्या सुमारास श्री. कीर्तिदा तारी (रा. मेढा जोशीवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) हे त्यांची IND-MH-५-NM-५१७५ क्रमांकाची ‘संगम’ ही नौका घेऊन मालवणसमोरील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यांच्यासोबत श्री. सचिन केळूसकर आणि श्री. जितेश वाघ हे खलाशी म्हणून होते. सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास मासेमारीसाठी जाळी सोडत असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि समुद्रातील जोरदार लाटा नौकेला धडकल्या. या धडकेने नौका तात्काळ उलटली आणि त्यातील तिघेही मच्छिमार समुद्रात पडले.
नौका उलटल्यानंतर कीर्तिदा तारी आणि सचिन केळूसकर यांनी नौका धरून ती सरळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कीर्तिदा तारी यांनी जितेश वाघ यांना त्यांच्यापासून अंदाजे १५ ते २० फूट अंतरावर पोहताना पाहिले. मात्र, नौका सरळ करून त्यांना नौकेत घेण्यासाठी जेव्हा ते त्यांच्या दिशेने गेले, तेव्हा जितेश वाघ त्यांना कोठेही दिसून आले नाहीत. या घटनेनंतर घाबरलेल्या कीर्तिदा तारी आणि सचिन केळूसकर यांनी जवळच्या खडकाळ भागात जितेश वाघ यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ स्थानिक मच्छिमारांना बोलावून पुन्हा शोधकार्य सुरू केले, परंतु जितेश वाघ यांचा काही थांगपत्ता लागला नाही.
प्रशासनाकडून तातडीने दखल आणि शोधमोहिमेला गती
या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी मालवण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक, मालवण यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा आपत्ती निवारण कक्ष येथे या घटनेची माहिती देण्यात आली असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. एनडीआरएफच्या पथकाने अत्याधुनिक साधनांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली आहे.
स्थानिक मच्छिमारांनीही स्वयंप्रेरणेने शोधमोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यांची समुद्रातील अनुभव आणि स्थानिक ज्ञानामुळे शोधकार्याला मोठी मदत होत आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने उपलब्ध केलेल्या ड्रोनच्या साहाय्यानेही समुद्रात जितेश वाघ यांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेची माहिती कोस्ट गार्ड, रत्नागिरी कार्यालयालाही देण्यात आली असून, त्यांच्याकडूनही आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
तांत्रिक मदतीचा वापर
शोधमोहिमेला अधिक प्रभावी करण्यासाठी INCOS (Indian National Centre for Ocean Information Services) च्या SARAT (Search and Rescue Tools) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे बेपत्ता मच्छिमार समुद्राच्या प्रवाहामुळे आणि वाऱ्यामुळे कोणत्या दिशेने वाहून गेला असेल, याचा अंदाजित आराखडा (मॅपिंग) काढण्यात आला आहे. या आराखड्यात नमूद केलेल्या भागांमध्ये शोधमोहीम अधिक तीव्रतेने राबवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना, मच्छिमारांना, सागरी सुरक्षा रक्षकांना आणि सागरमित्रांना या घटनेबाबत कळविण्यात आले आहे. जर जितेश वाघ आढळून आल्यास तात्काळ मत्स्यव्यवसाय कार्यालयास माहिती देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यामुळे बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
पालकमंत्र्यांकडून घटनेची चौकशी आणि मदतीचे आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, माननीय ना. नितेशजी राणे साहेब यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ प्रशासनासोबत चर्चा करून घटनेची सखोल चौकशी केली. तसेच, जितेश वाघ यांच्या शोधकार्यासाठी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. याव्यतिरिक्त, बेपत्ता मच्छिमार जितेश वाघ यांच्या कुटुंबास शासकीय योजनेअंतर्गत देय असलेले सर्व लाभ तातडीने मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
सध्या जितेश वाघ यांचा शोध सुरू असून, जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, कोस्ट गार्ड आणि स्थानिक मच्छिमारांकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.