मोठी बातमी.!कोल्हापूर जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

शरीरातून रक्त वाहत असतानाचे फोटो व्हायरल

कोल्हापूर प्रतिनिधी: विधानसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंड व्हायला अवघे काही तास असताना कोल्हापूरच्या करवीर विधानसभा मतदार संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संताजी घोरपडे हे रविवारी रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परतत होते. त्यावेळी मनवाड येथे सहा ते सात लोकांनी त्यांची गाडी थांबवली. जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला भेटायला थांबले असतील, असे सुरुवातीला संताजी घोरपडे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह या लोकांची विचारपूस करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी बाहेरील लोकांनी काठ्या आणि भाल्यासह संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला केला.संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापतसंताजी घोरपडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून आणि हातामधून रक्त वाहत होते. मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबसा परतावून लावला. त्यानंतर हल्लेखोर रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेले. जाताना त्यांनी संताजी घोरपडे यांच्या गाडीवरही दगडफेक केली.

हल्ला करणारे लोक कोण?

दरम्यान संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरमध्ये परतले. यानंतर संताजी घोरपडे यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत असतानाचे फोटो कोल्हापूरमध्ये व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करणारे लोक कोण होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यंदा करवीर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.

Oplus_131072
error: Content is protected !!