कणकवलीतील सुशांत दळवी हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट

संशयित मुकादम पोलिसांच्या ताब्यात

कणकवली : कणकवली येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खळबळजनक खून प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम (वय १९, रा. ओरोस डोंगरेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण कणकवली शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, सध्या पोलिसांकडून संशयिताची कसून चौकशी सुरू आहे.

गुरुवारी रात्री शिकारीसाठी गेले होते

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत दळवी आणि अमर कदम हे दोघेही गुरुवारी रात्री शिकारीसाठी गेले होते. प्राथमिक पोलीस तपासात असे स्पष्ट होत आहे की, शिकारी दरम्यान काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला किंवा अन्य काही कारणाने अमर याने सुशांत यांच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात सुशांत दळवी यांचा मृत्यू झाला असून, घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

अमर कदम याने सुशांत दळवी यांचा खून नक्की कोणत्या कारणातून केला, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. दोघेही एकत्र कामाच्या निमित्ताने असल्याने त्यांच्यात काही जुना वाद होता की शिकारीच्या वेळी अचानक काही घडले, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच हत्येमागचे नेमके गूढ उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!