आंबोली घाटात पर्यटकांच्या हुल्लडबाजीने वाहतूक कोंडी, कुटुंबांना मनस्ताप

आंबोली: “दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये सध्या पावसाळी पर्यटनाला मोठा बहर आला आहे. येथील निसर्गरम्य धबधबे, दाट धुके आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना विशेषतः आकर्षित करत आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या संख्येने कुटुंबे आंबोलीला सहलीसाठी येत आहेत, ज्यामुळे सध्या आंबोलीचे वातावरण पर्यटकांच्या गर्दीने गजबजले आहे.

मात्र, या आनंददायी वातावरणात काही तरुणाईची हुल्लडबाजी कौटुंबिक सहलीसाठी आलेल्या पर्यटकांना मोठा मनस्ताप देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच कर्नाटक राज्यातील काही तरुण आपल्या वाहनांवर चढून डीजेच्या तालावर नाचताना दिसले. आंबोली घाट रस्त्यावर धबधब्यांजवळ पर्यटकांची वाढती गर्दी असतानाच, अशा प्रकारच्या हुल्लडबाजीमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

या वाहतूक कोंडीमुळे केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर आंबोलीमार्गे ये-जा करणाऱ्या सामान्य प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आंबोलीतील निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना या हुल्लडबाजीमुळे सुरक्षित आणि आनंददायी वातावरणाचा अनुभव घेता येत नाहीये.

आंबोलीच्या या सुंदर पर्यटन अनुभवाला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाने या हुल्लडबाजीवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पर्यटकांनी जबाबदारीने वागावे आणि शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

error: Content is protected !!