दोडामार्ग कनेक्शन उघड
निलेश देसाई अटकेत
दोडामार्ग : गोव्यातील धारगळ-पेडणे येथील सुकेकुळण परिसरात सोमवारी (३० जून २०२५) सकाळी एका १७ वर्षीय विद्यार्थ्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सायंकाळपर्यंत दोडामार्गमधील कळणे येथील निलेश गजानन देसाई याला म्हापसा येथून ताब्यात घेतले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी अज्ञात दुचाकीस्वारांनी केलेल्या या हल्ल्यात ऋषभ उमेश शेट्ये हा १७ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ सुकेकुळण-धारगळ येथे बसची वाट पाहत थांबला असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्यावर ॲसिड फेकले. त्याला तातडीने गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती आहे. ऋषभ म्हापसा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे.
पोलिसांनी सुरुवातीपासूनच या हल्ल्यामागे दोडामार्ग तालुक्यातील व्यक्तीचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार तपास करत पोलिसांनी अखेर निलेश गजानन देसाई याला अटक केली. हा हल्ला काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेचा सूड घेण्यासाठी करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत असून, संशयित आरोपी अटकेत आल्याने या घटनेमागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे.













