परत बोललात तर उलट्या करायला लावेन

नारायण राणेंनी भरला सज्जड दम

मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतीच नीलेश राणे, नीतेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? असा सवाल करत प्रकाश महाजन हे लायकीपेक्षा जास्त बोलत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम करेन, अशा शब्दांत खडेबोल सुनावले.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर भाजप मंत्री नीतेश राणे यांनी टीका केली होती. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नीतेश राणेंच्या टीकेचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला होता. यानंतर आता या वादात भाजप खासदार नारायण राणे यांनी उडी घेतली असून त्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहीत महाजन यांचा शेलक्या शब्दांत पानउतारा केला आहे. नारायण राणे यांच्या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.

नेमके काय म्हणाले नारायण राणे?

प्रकाश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे. श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत.

प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखादया पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये एवढी तुमची कुवत नाही. श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दीमता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात?

आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलट्या करायला लावेन, असा दम देखील नारायण राणेंनी प्रकाश महाजन यांना भरला आहे.

error: Content is protected !!