२ तास वाहतूक ठप्प
वैभववाडी : करूळ घाटात यू आकाराच्या धोकादायक वळणावर अवजड कंटेनर अडकल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. घाटात दोन्हीही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसिबीच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. हा प्रकार मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने कंटेनर दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला आहे.
गगनबावड्यापासून सुमारे १ किमी अंतरावर करूळ घाटात पहिल्याच यू आकाराच्या वळणावर कोल्हापूरहुन वैभववाडीकडे येणारा कंटेनर वळणाचा अंदाज न आल्यामुळे वळणात अडकून पडला. कंटेनर आणखी पुढे गेला असता तर खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला असता. ट्रक रस्त्यात मध्येच अडकून पडल्यामुळे रस्ता बंद झाला. फक्त मोटार सायकल व छोटी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा होता. तर सर्व मोठी वाहने यामध्ये ट्रक, टेम्पो, एस टी बस, खाजगी बस घाटात अडकून पडली होती. मध्यरात्री रात्री १ वाजता जेसिबीच्या साहायने ट्रक रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरु करण्यात आली. यामुळे वाहचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.













