देवगड : चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या संमत्तीशिवाय एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पीडित विवाहितेचा पती सागर रामदास अनभवणे (३२), सासरे रामदास अंनंत अनभवणे (६१) सासू रोहिणी रामदास अनभवणे (६२, सर्व रा. देवगड-सातपायरी) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ फेब्रुवारी २०२० ते ९ नोव्हेंबर २०२४ या घडली आहे. तीनही संशयितांना तात्काळ अटक करण्यात आली असून मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिली. या घटनेतील संशयित रामदास अनभवणे हे माजी जि. प. सदस्य आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचा संशयित सागर अनभवणे याच्याशी १६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेमविवाह झाला होता. या प्रेमविवाहाला संशयित सागरचे वडील रामदास अनभवणे व आई रोहिणी या दोघांचा विरोध होता. परंतु, संशयित सागरने त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या विवाहास मान्यता दिली होती. मात्र, लग्नाच्यावेळी सागरला दोन तोळ्याची सोन्याची चेन देण्याचा अट्टाहास सासरच्या मंडळींनी पीडितेच्या माहेरच्या मंडळींकडे केला होता. परंतु पीडित विवाहितेच्या माहेरच्या मंडळींना आर्थिकदृष्ट्या ते शक्य झाले नाही. त्यानंतर संशयित सागर, सासरे रामदास, सासू रोहिणी यांनी विवाहितेच्या आईकडे चार तोळे सोने व मोटारसायकल देण्याची मागणी केली. तसेच या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी पीडित विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित विवाहिता ही अडीच महिन्यांची गरोदर असताना तिच्या इच्छेविरुद्ध तिचा पती सागरने तिला एका खासगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला. या प्रकरणी पीडित विवाहितेने देवगड पोलीस ठाण्यात संशयित पती सागर अनभवणे, सासरे रामदास अनभवणे, सासू सौ. रोहिणी अनभवणे या तीनही संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी तीनही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८९, ८५, ३१६ (२), ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगाडे करत आहेत.













