निलेश राणे यांनी हायस्पीड ट्रॉलरवर कठोर कारवाई करण्याची मांडली होती भूमिका
मालवण प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.ही कारवाई मालवण तारकर्ली येथील समुद्रात पकडलेल्या हायस्पीड ट्रॉलर वर केली आहे.महाराष्ट्र मासेमारी सागरी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत महाराष्ट्र कोकण विभागातील आतापर्यंतचा ट्रॉलरवर हा सर्वात मोठा दंड आकारला आहे. मालवण तारकर्ली येथील समुद्रात पकडलेल्या कर्नाटक येथील हायस्पीड ट्रॉलरवर ही कारवाई करण्यात आली असून पंचवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे वीस ही दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. अशी माहिती मत्स्य अधिकारी मालवण यांनी दिली आहे.
नेमके काय घडले?
१९ ऑक्टोबर रोजी पहाटे मालवण तारकर्ली समोर मत्स्य विभाग अधिकारी गस्त घालत असताना कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नौका वायुपुत्र 11 नों. क्र.- IND-KA -02-MM-5812 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात ट्रॉलिंग जाळ्याने मासेमारी करत असलेला हायस्पीड ट्रॉलर हा अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी, मालवण यांनी पकडली.सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणण्यात आली. त्यावर मोठया प्रमाणात असलेल्या मासळीचा लिलाव करण्यात आला. यातून रु. ४,७७, ५०४ (चार लक्ष सत्त्याहत्तर हजार पाचशे चार) रक्कम शासन जमा करण्यात आले.परवाना अधिकारी मालवण यांनी सदर नौका मालकावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये प्रतिवेदन दाखल केले.
त्यानुसार महाराष्ट्र मासेमारी सागरी नियमन अ च्या १६(२) अन्वये सदर प्रकरणी सुनावणी अभिनिर्णय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयात मालवण येथे झाली. त्यानुषंगाने न्यायनिर्णय देण्यात आला. न्यायनिर्णयातील आदेशानुसार नौका मालक यांना यांना पंचवीस लाख सत्याऐंशी हजार पाचशे वीस रुपये शास्ती अर्थात बोटीवरील मासळी लिलावातून प्राप्त रक्कमच्या पाच पट दंड करण्यात आला आहे.महाराष्ट्र मासेमारी सागरी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत सदर दंडाची रक्कम हि कोकण विभागातील सर्वात जास्त दंड रक्कम असल्याची माहिती सहाय्यक मत्स्य. विकास परवाना अधिकारी अधिकारी, मालवण भालेकर यांनी दिली आहे.
काय आहेत स्थानिक मच्छीमारांच्या समस्या
महाराष्ट्र सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हे हायस्पीड ट्रॉलर घुसखोरी करून मोठया प्रमाणात मासळीची लूट करतात. स्थानिक मच्छिमार जाळ्यांचे मोठे नुकसान होते. अंगावर येतात. यां बाबत स्थानिक मच्छिमार यांनी निलेश राणे यांची मागील महिन्याय भेट घेऊन समस्या मांडली.
हायस्पीड ट्रॉलर वर कठोर कारवाई व्हावी निलेश राणेंची भूमिका
अशा हायस्पीड ट्रॉलर वर कठोर कारवाई व्हावी याबाबत निलेश राणे यांनी भूमिका मांडली होती.याबाबत मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई व्हावी असे निलेश राणे यांनी यावेळी म्हंटले होते . त्यानंतर हायस्पीड ट्रॉलरवर मत्स्य विभागाची कारवाई सुरु होती. तारकर्ली समुद्रात कर्नाटकातील हायस्पीड पकडला. यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशीही भुमिका निलेश राणे यांनी मांडली होती. आता या हायस्पीड ट्रॉलरवर महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठी कारवाई केली आहे.