आंबोली : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांना आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगदवाडी येथे करण्यात आली. त्यांच्याकडून आलिशान होंडा सिटी कार जप्त करण्यात आली असून गाडीसह एकूण ७ लाख १६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किरण ज्ञानोबा साळुंके (वय ४६, रा. वाकड, ता. हवेली) राजेश अंकुश गायकवाड (वय २९, रा. अंबडवेट, ता. मुळशी) दोघे राहणार पुणे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे २ लाख १६ हजार रुपयाची दारू आढळून आली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, आंबोली दूरक्षेत्र अंमलदार हवालदार लक्ष्मण काळे, रामदास जाधव, पोलीस नाईक मनीष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे आणि चंद्रकांत जंगले यांनी केली.