कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी महायुती सरकारकडून योजनांचा “पाऊस”
कामगार हिताच्या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही..निलेश राणेंची ग्वाही
कुडाळ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य संच वितरित करण्यासाठी कुडाळ येथे स्वाभिमानी कामगार संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, सरकारी कामगार अधिकारी अजिंक्य बावले, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते,शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे सचिव मंगेश चव्हाण, संघटक अशोक बावलेकर, समन्वयक सतीश कदम आदी उपस्थित होते. स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून मंडळाच्या विविध योजनांची माहिती देत मागील वर्षात कामगारांना कल्याणकारी योजनांच्या लाभाबाबत आढावा सादर केला. सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी मंडळ स्थापन झाल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कामाची आकडेवारी देत कामगारांनी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त वेळ कामगारांच्या हितावह कार्यासाठी देण्याचे अधिकाऱ्यांना आवाहन करत कामगार कल्याणाच्या बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची ग्वाही देत महायुती सरकारकडून योजनांचा “पाऊस” पाडला असून कामगारांनी सतर्क राहून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याशिवाय प्रसाद गावडेंच्या कामगार चळवळीतील कामाचं कौतुकही केले.कार्यक्रमाला जवळ पास 650 कामगारांनी हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 400 कामगारांना गृहपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले व उर्वरित कामगारांना 23 व 24 मे रोजी साहित्य संच देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी अजिंक्य बावले यांनी दिली.













