ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे आयोजन
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे.
चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा आणि संगीत यांचे अद्वितीय संमीलन असते. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना ही जुनी व लुप्त होत चाललेली लोककला प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे.
“चित्रकथी म्हणजे आमच्या परंपरेचा आत्मा आहे. ही कला लोकांनी अनुभवावी, शिकावी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावी, हेच आमचं ध्येय आहे,” असे चेतन परशुराम गंगवणे म्हणाले. ते कार्यशाळेचे समन्वयक असून पद्मश्री परशुराम गंगवणे यांच्या वारशाचे जतन करणाऱ्या कुटुंबातील सदस्य आहेत.
केवळ ₹१०० प्रवेश शुल्कात ही कार्यशाळा कोणालाही खुली असून, विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील जिज्ञासूंना सहभागी होता येईल.