अणाव (तालुका – कुडाळ) : शिक्षण क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वाने आणि संस्कारांनी एक अमीट ठसा उमटवणाऱ्या मा. सौ. सुवर्णा शिवराम केणी मॅडम (प्राथमिक शिक्षिका, जि.प.पू.प्रा.शाळा अणाव, दाभाची वाडी) या दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाल्या.
त्यांच्या २९ वर्षे ४ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात केवळ ज्ञानाची नाही तर मूल्यसंस्कारांचीही पेरणी केली. विषयातील सखोल अभ्यास, सुंदर फलकलेखन, गोड मराठी व मालवणी भाषाशैली, आणि सौम्य परंतु प्रभावी नेतृत्व यामुळे त्या प्रत्येक शाळेच्या विकासाचा आधारस्तंभ ठरल्या.
त्यांचं शैक्षणिक योगदान हे जितकं प्रभावी, तितकंच सामाजिकही आहे. शिवडाव गावातील सण-उत्सव, सार्वजनिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. गावातील लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले.
केणी मॅडम यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने शिक्षण परिषद मध्ये हूमरमळा (कुडाळ) केंद्रातर्फे दिनांक २९ एप्रिल रोजी भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. तसेच १ मे रोजी त्यांचा शाळा व अणाव-दाभाची वाडी ग्रामस्थांतर्फे विशेष सत्कार आयोजिण्यात आला आहे.
शैक्षणिक कारकीर्दीइतकीच त्यांची कुटुंबवत्सल भूमिकाही प्रेरणादायी ठरली आहे. त्यांचे दोन्ही सुपुत्र – प्रशांत आणि कौस्तुभ – आज स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यांचाही केणी मॅडम यांच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा राहिला आहे. पती श्री. शिवराम केणी यांची यशस्वी सार्वजनिक वाटचाल देखील त्यांच्या प्रेरणादायी पाठिंब्यामुळे समृद्ध झाली आहे.
त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचे सहकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केणी मॅडम यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!














