जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन छेडण्याचा सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे आणि गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थ यांचा प्रशासनाला इशारा
गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थांचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता
मालवण : गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेत असलेल्या मालवण तालुक्यातील गोळवण गावातील बनावट घरपत्रक उतारा प्रदान केल्या प्रकरणी गोळवण-कुमामे-डिकवल विद्यमान सरपंच हे गटविकास अधिकारी मालवण यांच्या अहवालामध्ये कलम ३९ नुसार दोषी आढळले होते. सदरचे प्रकरण कारवाईसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करण्यात आले होते. परंतु अद्याप पर्यंत सदर प्रकरणावर कोणतीही सुनावणी करण्यात आली नाही. त्यामुळे गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे,ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असून ग्रामस्थांचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता आहे.
बनावट घरपत्रक उतारा प्रदान केल्याप्रकरणी दोषी सरपंचावर येत्या आठवड्याभरात कारवाई न झाल्यास गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष परशुराम गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ‘थाळी बजाओ’ आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. बनावट घरपत्रक उतारा प्रकरणाला बरेच दिवस उलटूनही दोषींवर कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.













