सोन्याचा हार चोरी केल्याप्रकरणी चोरटा ताब्यात

सावंतवाडी : खासकीलवाडा येथील धनश्री विजय चव्हाण यांच्या घरात घुसून सोन्याच्या हाराची चोरी केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी न्हावेली येथील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली. महादेव उर्फ अक्षय सुरेश मेस्त्री असे त्याचे नाव आहे. आपण हा प्रकार केल्याची कबुली त्याने दिली आहे. आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खासकीलवाडा येथे राहणाऱ्या सौ. चव्हाण यांच्या घरात ७ तारखेला अज्ञात चोरट्याने चोरी केली होती. यात सोन्याचा हार लंपास केला होता. या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी गोपनीय माहिती देणाऱ्यांचा आधार घेतला. यात मेस्त्री याने हा हार चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री त्याला हारासह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता आपण ही चोरी केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

error: Content is protected !!