सावंतवाडी : माडखोल-वाळके कुंभे येथे काजू बागायतीत गेलेल्या शेतकऱ्यांचा मृतदेह आढळून आला आहे. लवू रामा गावडे (वय ५९ रा. माडखोल- डुंगेवाडी) असे त्याचे नाव आहे. ते काल सायंकाळी बागातयतीत गेले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान त्याचे बंधू दिपक गावडे यांनी दिलेल्या खबरी नुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? हे वैद्यकीय अहवालानंतर कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावडे हे नेहमी प्रमाणे वाळके कुंभे येथे असलेल्या आपल्या काजू बागायतीत काजू आणण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणीहुन ते काल सायंकाळी उशिरा पर्यंत परतले नाही तसेच त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ लागत होता. दरम्यान त्यांची रात्री उशिरा शोधाशोध केली. मात्र ते घरी परतले नाहीत. त्यामुळे आज सकाळी राजकुमार राऊळ, उत्तम सावंत, विलास गावडे आदींनी काजू बागायतीत जावून पाहणी केली असता ते त्या ठिकाणी बेशुध्दावस्थेत दिसले. यावेळी गावडे यांनी याबाबतची माहिती पोलिस पाटील उदय राऊत यांना दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. परंतू त्यांची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.













