उबाठा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप
मालवण : तालुक्यात जी विकासकामे सुरू आहेत ती महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाली होती. विद्यमान आमदार निलेश राणे या कामांचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत. या उलट नुकत्याच झालेल्या राज्याच्या आर्थिक बजेटमधून मतदार संघातील कोणकोणत्या गावांना निधी मंजूर झाला. मच्छीमार, शेतकरी यांना कोणता दिलासा दिला हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकातून दिले आहे.
आमदार राणे सध्या मतदार संघाचा दौरा करत विकास कामांची पाहणी करत आहेत. प्रत्यक्षात ही विकासकामे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात मंजूर झाली आहेत.महायुतीच्या तीन वर्षाच्या काळात या विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळेच ही कामे रखडली होती. मात्र आता या कामांचे श्रेय घेण्याचे काम आमदार राणे करत आहेत. ते सध्या ज्या कामाची पाहणी करत आहेत ती त्यांच्या कार्यकर्त्यांची टक्केवारी वाढवून मिळावी यासाठीच असल्याचा आमचा संशय आहे. कारण निवडणूक काळात त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. विद्यमान आमदारांनी राज्याच्या आर्थिक बजेटमधून मतदार संघातील कोणकोणत्या गावातील कामे मंजूर केली तसेच जिल्हा नियोजनामधून कोणकोणत्या कामांना निधी उपलब्ध करून दिला हे जाहीर करावे असे आव्हान श्री. खोबरेकर यांनी दिले आहे.













