सावंतवाडी : सांगेली खालचीवाडी येथे राहणाऱ्या निशांत धोंडिबा नार्वेकर या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास निदर्शनास आली. निशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.
सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला.निशांतच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.













