क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेट करणे आले तरुणाच्या अंगलट

१ लाख ६ हजारांची फसवणूक ; पोलिसात तक्रार

कणकवली : क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेट करण्याच्या प्रयत्नात कणकवली येथील ओमकार संतोष सावंत(२९, जानवली-साटमवाडी) याची तब्बल १ लाख ६ हजार रूपयाची फसवणुक झाली आहे. ही घटना रविवार ९ मार्च रोजी दुपारी १२.३० वा. सुमारास घडली. याबाबत फिर्यादि ओमकार सावंत याने कणकवली पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार नोंदवली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादि ओमकार सावंत याचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कणकवली येथे सेव्हींग खाते असून त्यावर तो व्यवहार करतो. एक महिन्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया येथून क्रेडिट कार्डची ऑफर आली होती. क्रेडिट कार्ड ची आवश्यकता असल्याने सदरचे क्रेडिट कार्ड ओमकार याने स्विकारले. मात्र ते सुरू केले नव्हते. ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता ओमकार कामाच्या ठिकाणी असताना त्याला एक अज्ञात व्यक्तीचा दोन नंबर वरून फोन येत होते. अनोळखी नंबर असल्याने त्या फोनला त्याने प्रतिसाद दिला नाही. ९ मार्च रोजी त्याच अनोळखी नंबरवरून दुपारी १२.३० वाजता पुन्हा फोन आला. यावेळी ते फोन ओमकार याने स्विकारले. यावेळी दोन्ही मोबाईल नंबरवर बोलत असणारा अनोळखी इसम हा एकच असल्याचे जाणवले. सदर अनोळखी इसम शुद्ध मराठी भाषेत बोलत होता. यावेळी त्या अनोळखी इसमाने आपण स्टेट बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याचे सांगितले. तसेच तुमचे क्रेडिट कार्ड चालू झालेले नाही. चालू न केल्यास तुम्हा रूपये २,२०० रूपये एवढा दंड भरावा लागेल असे सांगितले. यावेळी त्या इसमाने विचारल्याप्रमाणे ओमकार याने त्याला नाव व जन्मतारीख सांगून मला क्रेडिट कार्ड चालू करावयाचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल असे विचारल्यावर व्हाट्अॅप नंबरवर एसबीआय क्रेडिट असे अॅप्लिकेशन पाठविले. ओमकार याला संशय आल्याने त्याने ते अॅप्लिकेशन सुरू केले नाही. त्यानंतर फोन सुरू असताना अनोळखी इसमाने फोन कट केला. त्यानंतर ओमकारच्या मोबाईलवर पेमेंट डिक्लाईन चे एकूण बावीस मेसेज आले. त्यामध्ये सिंग एटरप्राईजमध्ये पैसे जाऊन रक्कम डिक्लाईन होऊन यामध्ये क्रेडिट कार्डवरील सिंग एटरप्राईजच्या नावे ९,७३७.६५ पुन्हा ९,७३७.६५, ८३,०२६.३० असे एकूण तीन ट्रांक्झॅक्शनमध्ये १ लाख ६ हजार रूपयाचे रद्द झाल्याचा मेसेज आला. यावेळी त्यांने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला. यावेळी ओमकार याच्या क्रेडिट कार्डवरील १ लाख ६ हजार रूपये डेबिट झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी अनोळखी इसमाने आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच, पोलिस ठाण्यात धाव घेऊन सदर अनोळखी इसमाविरोधात तक्रार नोंदवली आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करीत आहे.

error: Content is protected !!