माजी आमदार प्रमोद जठार यांचा उद्धव ठाकरेंना टोला
कणकवलीत पत्रकार परिषद घेत साधला निशाणा
उद्धव ठाकरे हे फेक नेते आहेत. विधानसभा निवडणुकीत हिंदू बांधवांनी जातीपाती च्या राजकारणात न विभागता एकजुटीने महायुती च्या पाठीशी राहावे एक है तो सेफ है…उद्धव ठाकरे फेक है असा टोलाही भाजपा संघटक समन्वयक, माजी आमदार प्रमोद जठार यांनी कणकवली प्रहार भवन येथील पत्रकार परिषदेत लगावला.
यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर,सरपंच रवींद्र शेट्ये उपस्थित होते. यावेळी जठार पुढे म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 318 नं पानावर उल्लेख केलाय की अडीच वर्षे मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरे हे दोन दिवसही मंत्रालयात गेले नाहीत ही चिंतेची बाब आहे.खुद्द शरद पवार यांनीच उद्धव ठाकरेंची क्षमता किती कमी आहे हे सांगितलं आहे. ज्याला बजेट कळत नाही, विकास करत नाही ते उद्धव ठाकरे. ग्रीन रिफायनरी प्रकल्पात अधिकाऱ्यांनी फसवले म्हणून केंद्राला पॉझिटिव्ह पत्र दिले म्हणतात. ज्याला रिफायनरी नको, समृद्धी महामार्ग नको सी वर्ल्ड प्रकल्प नको, विकास नको त्या उद्धव ठाकरेंना कायम घरी बसवण्याची वेळ आहे. उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कायम आपल्या भाषणाची सुरुवात तमाम हिंदू बांधवांनो अशी करत.उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात महाराष्ट्रप्रेमी म्हणून करतात. उद्धव ठाकरे कधीच भाषणात आपल्या वडिलांचा स्वर्गीय बाळासाहेबांचा उल्लेख आपल्या भाषणात हिंदुहृदयसम्राट असा करत नाहीत. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुती विजयी सिक्सर मारणार असा विश्वासही भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला. ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प कोकण विकासासाठी आवश्यक आहेच. भले महायुती चे राजापूर विधानसभेचे उमेदवार किरण सामंत यांनी ग्रीन रिफायनरी विषयच बंद झाला असल्याचे म्हटले आहे, त्याऐवजी पर्यावरण पूरक दोन प्रकल्प आणत असल्याचे जाहीर करत नाणार ग्रीन रिफायनरी ला विरोध जाहीर केला. त्याबाबत बोलताना जठार म्हणाले की सामंत यांनी पर्यावरण पूरक प्रकल्प आणवेच. पण रिफायनरी हा उद्योग केवळ राजापूर समुद्र किनाऱ्या पुरता नाहीय तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या विकासासाठी नाणार ग्रीन रिफायनरी आवश्यक आहे. जेव्हा कोकणात बंदरे विकसित होती तेव्हा कोकण विकसित होते. म्हणून ग्रीन रिफायनरी अत्यावश्यक आहे असेही जठार म्हणाले.













