ए.ए. स्पोर्ट्स आरवली संघ ठरला उपविजेता
कुडाळ : आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेचा विजेता उभादांडा वेंगुर्ला हा संघ ठरला.
आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दादा साईल मित्रमंडळ आयोजित व शिवसेना शाखा पणदूर पुरस्कृत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पणदूर येथे करण्यात आले होते. दिनांक १५, १६ व १७ मार्च या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना ए.ए. स्पोर्ट्स आरवली विरुद्ध उभादांडा वेंगुर्ला असा रंगला होता. सुरवातीला ए.ए. स्पोर्ट्स आरवली नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यावेळी उभादांदा वेंगुर्ला संघाने ए.ए. स्पोर्ट्स आरवली संघाला विजयासाठी ४८ धावांचे आव्हान ठेवले होते. यानंतर ए.ए. स्पोर्ट्स आरवली संघाच्या सलामी जोडीने पहिल्याच षटकात १९ धावांची भागीदारी करत सामना काहीसा आपल्या बाजूने झुकावला होता. आरवली संघाला विजयासाठी ३ षटकात केवळ २९ धावांची आवश्यकता होती. आरवली संघ हा सामना सहज जिंकेल असे सर्वांनाच वाटले होते. परंतु दुसऱ्या षटकातच सलामीची जोडी फोडण्यात उभादांडा संघाला यश आले. पुढे उभादांडा संघाच्या भेदक गोलंदाजी समोर आरवली संघाच्या फलंदाजांना टिकता आले नाही. अखेर उभादांडा संघाने आरवली संघावर १७ धावांनी विजय मिळवला.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कूपन देखील ठेवण्यात आले होते. यामध्ये अनेक आकर्षक भेटवस्तू देखील ठेवण्यात आल्या होत्या. या प्रेक्षणीय सामन्यांचा उपस्थित सर्वांनी आस्वाद घेतला. तसेच दादा साईल मित्रमंडळ व शिवसेना शाखा पणदूर यांचे मुक्तकंठाने कौतुक केले.














