ब्युरो न्यूज: एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी लवकरात लवकर कृती आराखडा तयार करू,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत दिली.भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रश्नांवर सरनाईक यांनी ही माहिती दिली.या चर्चेत सहभाग घेत दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना ठरलेल्या तारखेला पगार मिळावा यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करणार का, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का, असे प्रश्न केले. त्यावर मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली.
एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच ‘पीएफ’
राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) उपदान निधीचे दोन हजार २१४ कोटी ४७लाख रुपये देणे बाकी आहे. परंतु कोणत्याही कर्मचाऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये दिले.