गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार सह इतर राज्यांच्या समावेश
१५ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान नाही
कुडाळ: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यातील चित्ररथांचा समावेश असतो. यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. मात्र यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान मिळालेले नाही.
कोणकोणत्या राज्यांचा समावेश?
यामध्ये गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, चंडीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथाला अद्याप स्थान मिळाले नसल्याचे वृत्त समोर आले.
राजधानी दिल्लीच्या चित्ररथालही नकार
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आली असल्याचे समोर येतंय. राजधानीच्या चित्ररथाला नाकारण्याची ही चौथी वेळ आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “मागील कित्येक वर्षांपासून दिल्लीच्या चित्ररथाला संचलनात सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात येत आहे. हे कसले राजकारण? दिल्लीच्या लोकांचा हे इतका का तिरस्कार करतात?” असा सवाल त्यांनी केला आहे.