कुडाळ: कुडाळ येथे आज दुपारी तीनच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या अल्टो कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात वेताळ-बांबर्डे येथील महिला जागीच ठार झाली असून दुचाकी चालवत असलेले त्यांचे पती गंभीर जखमी झाले. दरम्यान वसुंधरा जनार्दन मांजरेकर (वय ५५) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे तर या जनार्दन बापू मांजरेकर असे जखमींचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवलीतील अल्टो चालक वरूण आनंद दामले (वय ४०) यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे सविस्तर वृत्त?
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की. मांजरेकर कुटुंब हे दुचाकीने शाळेत कार्यक्रम पाहण्यासाठी जात होते. यावेळी एमआयडीसी परिसरात ते आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अल्टो कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोघेजण खाली कोसळले. यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मांजरेकर या जागीच ठार झाल्या तर त्यांच्यासोबत असलेल्या पतीला गंभीर दुखापत झाली. त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.