वेंगुर्ले : तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास रवींद्र तिरोडकर (वय 31) याचा आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.
तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास तिरोडकर हा बुधवार १८ रोजी सकाळी ९ वाजता कुडाळ येथे मित्राच्या लग्नाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. दरम्यान तो सायंकाळी घरी न परतल्याने आज गुरुवारी त्याचा भाऊ विवेक रवींद्र तीरोडकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात बेपत्ताची खबर दिली होती. त्यानुसार वेंगुर्ले पोलीस स्थानकात नापत्ता नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज गुरुदास याचा मृतदेह शिरोडा वेलागर येथे आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. सायंकाळी उशिरा वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन झाले. दरम्यान त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस निरीक्षक श्री. खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार योगेश राऊळ हे करीत आहेत.गुरुदास याच्या पश्चात आई , वडील , भाऊ , भावजय , बहीण असा परिवार आहे.