मुंबईतून तिकीट आरक्षण करता येणार नाही
मुंबई प्रतिनिधी: मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएनआर कॉम्प्रेशनसाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम ( पीआरएस ) येत्या १४ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून ते १५ डिसेंबर २०२४ च्या पहाटे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. मुंबईच्या पीएनआर कॉम्प्रेशनसाठी मुंबईतील पीआरएस प्रवासी आरक्षण प्रणाली दिनांक १४ डिसेंबरच्या २०२४ च्या रात्री ११.४५ वाजल्यापासून दि. १५ डिसेंबर २०२४ च्या पहाटे ०४.४५ वाजेपर्यंत बंद राहील असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.
इंटरनेट तिकीट बुकींग देखील बंद
प्रवासी तिकीट आरक्षण प्रणाली बंद असल्यामुळे, पीआरएस सेवा, कोचिंग रिफंड सेवा आणि इतर सेवा उदाहरणार्थ आयव्हीआरएस, चालू आरक्षण, चार्ट डिस्प्ले,टच स्क्रीन, रिफंड काऊंटर आणि कोचिंग रिफंड टर्मिनल इत्यादी सेवा देखील या वेळेत उपलब्ध होणार नाहीत. यामुळे प्रवाशांना सध्याच्या रिफंड नियमांनुसार परताव्यासाठी टीडीआर जारी केला जाईल.वर नमूद केलेल्या कालावधीत मुंबई पीआरएस गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग देखील उपलब्ध होणार नसल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.