संशयित आरोपींच्या वतीने ॲड.विलास परब यांचा युक्तिवाद
कुडाळ प्रतिनिधी: वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसारशेड्युल वन मधील संरक्षित असलेले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करी च्या गुन्ह्यातील चार आरोपींची प्रत्येकी 50 हजार रक्कमेच्या सशर्त जामिनावर आज मुक्तता करण्यात आली. आरोपींच्या वतीने अँड. विलास परब यांनी यशस्वी युक्तिवाद केला. तपासकामी सहकार्य करणे, तपासी अधिकारी तपासकामी बोलावतील तेव्हा हजर राहणे, पुराव्यात हस्तक्षेप न करणे आदी अटींसह जामीन मंजूर करण्यात आला.रविवार 1 डिसेंबर रोजी वनखात्याने सापळा रचून वारगाव येथील ढाब्यावर खवले मांजर विक्री च्या उद्देशाने आलेल्या एकूण 5 आरोपीना गजाआड केले होते. त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. उर्वरित चार आरोपी विशाल विष्णू खाडये (लोरे नं 1), संदीप घाडी, गिरीधर घाडी आणि गुरुनाथ घाडी (सर्व रा. मुटाट) यांना वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. चारही आरोपींना 5 दिवस वनकोठडी सुनावण्यात आली होती. वनकोठडी ची मुदत संपल्यावर तपासी अधिकारी फॉरेस्ट रेंजर राजेंद्र घुणकिकर यांनी वरील आरोपींना कणकवली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले. वरील आरोपींना आणखी वनकोठडी मागितली. वाढीव वनकोठडी ला हरकत घेत आरोपींच्या वतीने वकीलानी मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले असून आरोपींनी तपासकामात पूर्ण सहकार्य केले आहे. सर्व आरोपी हे स्थानिक असून आवश्यक तपासकामी हजर राहतील असा युक्तिवाद करत वनकोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी ची मागणी केली. सर्व आरोपींना न्यायाधीशानी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपींच्या वतीने वकील विलास परब यांनी जामीन साठी अर्ज दाखल केला. न्यायाधीश ताजुद्दीन शेख यांनी सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. याकामी ऍड. मिलिंद सावंत यांनी सहकार्य केले.













