प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – पालकमंत्री नितेश राणे

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाद्वारे शासनाच्या विविध सेवांचा लाभ

जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ भागांत शासकीय सेवा ऑफलाइन देण्यासाठी प्रयत्न करणार

सिंधुदुर्गनगरी : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून अधिक गतीने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा पोहोचवून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य साकार करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’चा शुभारंभ पालकमंत्री श्री. राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. राणे यांनी विविध शासकीय विभागांनी उभारलेल्या योजनांच्या माहितीपर स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यानंतर विविध शासकीय योजनांच्या प्रातिनिधिक लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासन सातत्याने कार्यरत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक गतिमान झाले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘महाराजस्व’ अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. केवळ शिबिरापुरते मर्यादित न राहता सर्व विभागांनी वर्षभर याच कार्यगतीने काम करून नागरिकांच्या समस्या सोडविणे, त्यांचे हित जपणे आणि त्यांना समाधान देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचे स्मरण करताना त्यांनी सांगितले की, प्रशासनावरील त्यांची पकड आणि लोकाभिमुख कार्यशैली सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे अभियान आयोजित करण्यात आले असून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचा सखोल अभ्यास करून त्या प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा. लाभार्थ्यांची निवड पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सिंधुदुर्गच्या भौगोलिक परिस्थितीचा उल्लेख करत पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, शासनाच्या अनेक सेवा ऑनलाइन उपलब्ध असल्या तरी जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिकांना त्या सहज मिळत नाहीत. त्यामुळे अशा भागांमध्ये ऑफलाइन पद्धतीने शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी नागरिकांना सेवा देण्यासाठी परिश्रम घेत असून त्यांच्या चांगल्या कामाची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करणारे व्यासपीठ आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक बळकट झाला असून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. नागरिकांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग सदैव तत्पर असल्याचे सांगून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.

कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले की, समाजातील वंचित व मागास घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे.

प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी प्रास्ताविकात अभियानाच्या अंमलबजावणीची माहिती दिली. या अभियानांतर्गत महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा, प्रमाणपत्रे, मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नारकर, समाजकल्याण समिती सभापती रुहिता तांबे, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू, वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध योजनांचे लाभार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!