.वाढदिवस विशेष
✒️ तुळशीदास कुडतरकर/ कणकवली
“नेतृत्व म्हणजे केवळ एखाद्या पदावर विराजमान होणे नव्हे… नेतृत्व म्हणजे लोकांचा विश्वास जपणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने धडपड करत राहणे.हे जनसेवेचे व्रत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी अंगिकारले असुन
जनतेचा विश्वास, विकासाची तळमळ आणि लोकसेवेची अखंड भावना… या त्रिसूत्रीवर त्यांची पुढे वाटचाल सुरु आहे.
कणकवली नगरीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा १४ जुलै रोजी वाढदिवस …. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा….
कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी, सामाजिक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे शहर. काळाच्या ओघात शहराचा विस्तार होत गेला, नागरिकांच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि विकासाच्या नव्या संकल्पनाही आकार घेत गेल्या. अशा बदलत्या काळात शहराला आधुनिकतेची जोड देतानाच लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे नेतृत्व लाभणे ही शहरासाठी मोठी जमेची बाजू ठरते.
अशाच नेतृत्वांपैकी एक नाव म्हणजे कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर.
सामाजिक कार्यातून राजकारणात आलेल्या संदेश पारकर यांनी लोकप्रतिनिधित्व म्हणजे अधिकार नव्हे, तर जबाबदारी असल्याची भूमिका सातत्याने जपली. प्रत्येक नागरिकाशी संवाद, त्यांच्या समस्या समजून घेण्याची संवेदनशीलता आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची कार्यपद्धती यामुळे त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला.

पद असो वा नसो… लोकांशी असलेला त्यांचा संपर्क कधीच कमी झाला नाही. प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा, संकटसमयी आधार देणारा आणि विकासाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारा लोकनेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यामुळेच कणकवलीकरांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
नगराध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराच्या विकासाला नवी गती देण्यावर भर दिला. वाढत्या शहराच्या गरजा ओळखून पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. विविध शासकीय योजनांतून निधी उपलब्ध करून शहराच्या विकासाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
शहर सुशोभीकरणाच्या दृष्टीने नमो गार्डन, मराठा मंडळ परिसरातील गणपती सान्याचे सुशोभीकरण, रस्त्यांची सुधारणा तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शहर अधिक आकर्षक, सुबक आणि नागरिकांसाठी सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.

पर्यावरण संवर्धनालाही त्यांच्या कार्यात विशेष स्थान आहे. स्वच्छ, सुंदर आणि हरित कणकवली घडविण्याचा संकल्प त्यांनी कृतीतून मांडला. प्लास्टिकमुक्त शहर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती आणि नागरिकांचा सहभाग वाढविणारे विविध उपक्रम राबवून पर्यावरणपूरक विकासाचा संदेश त्यांनी दिला.
स्वच्छता ही केवळ नगरपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा विचार त्यांनी सातत्याने मांडला. नागरिकांचा सहभाग वाढवून शहर अधिक स्वच्छ आणि सुबक ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
युवक ही समाजाची खरी ताकद आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांना सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि रोजगाराभिमुख उपक्रमांमध्ये संधी मिळावी यासाठी विविध उपक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिले. नव्या पिढीने समाजकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, हा त्यांचा कायमचा आग्रह राहिला आहे.

राजकारणात मतभेद असू शकतात; पण विकासाच्या प्रश्नांवर एकमत असावे, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. शहराच्या प्रगतीसाठी सर्व घटकांना विश्वासात घेऊन, संवादाच्या माध्यमातून विकासाची दिशा निश्चित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
आज कणकवलीच्या भविष्यासमोर अनेक संधी आहेत. आधुनिक नागरी सुविधा, स्मार्ट विकास, पर्यावरणपूरक नियोजन, वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. या सर्व विकासकामांमागे कणकवली अधिक सक्षम, सुंदर आणि सर्वसमावेशक बनविण्याची दृष्टी आहे.
नगराध्यक्ष संदेशभाई पारकर यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य चांगले आरोग्य लाभो. हिच मनःपुर्वक सदीच्छा.




Subscribe









