“स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चित ध्येय ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते”- संदेश पारकर

कणकवली नगरपंचायतीतर्फे दहावी-बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

कणकवली : “गुणवत्ताच ही आजच्या काळातील खरी संपत्ती आहे. शिक्षणाच्या जोरावर कोणताही विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो. गरिबी हा शिक्षणाती अडथळा नसून जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर प्रत्येकजण आपले ध्येय गाठू शकतो.” विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेतल्यास भविष्यात निश्चित यश मिळेल. असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.

कणकवली नगरपंचायतीतर्फे कोकण विभागीय बोर्डाच्या दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कणकवली येथील एचपीसीएल (HPCL) हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी संदेश पारकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर,प्रा.हरिभाऊ भिसे ,प्रा.दिवाकर मुरकर, नगरसेवक संकेत नाईक, जय धुमाळे, बाळू पारकर, लुकेश कांबळे, नगरसेविका समिधा अंधारी, जुई मुरकर, दीपिका जाधव, धीरज मेस्त्री, नेहा तळेकर कर व प्रशासकीय अधिकारी, अमोल भोगले सहाय्यक प्रकल्प अधिकारी, प्रशांत राणे, मनोज धुमाळे, प्रवीण गायकवाड, पूजा तांबे, दिव्या सर्पे विनोद जाधव, सुजल मुणगेकर निकिता पाटकर रुचिता ताम्हाणेकर माधुरी वगरे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष पारकर पुढे बोलताना म्हणाले की, नगरपंचायतीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीच्या वतीने सन्मान व्हावा, अशी सर्वांची भावना होती. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. मूळतः २१ तारखेला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता; मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने कार्यक्रम पुढे ढकलावा लागला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कणकवली हे कोकणचे गांधी परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या पुण्यभूमीचे शहर असून शिक्षण, संस्कृती आणि विविध क्षेत्रांत शहराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या परंपरेचा वारसा विद्यार्थ्यांनी पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच पालकांच्या त्यागाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पालक मोठे कष्ट घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, “स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने निश्चित ध्येय ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते. दहावी आणि बारावी हे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असून त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत,” असे सांगितले.

नगरपंचायतीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी हरिभाई भिसे यांनीही मनोगत व्यक्त करताना संदेश पारकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्वतंत्र निधी उभारण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीमुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी,पालक, विद्यार्थी व शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा हा उपक्रम सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

error: Content is protected !!