माणगाव : युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती सदस्य श्री. योगेश धुरी यांच्या पुढाकारातून तसेच शिवसेना माणगाव-नानेली यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत माणगाव व नानेली येथील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, छत्री तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांनाही आवश्यक शैक्षणिक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत सर्वांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी, “समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान देणे हीच खरी समाजसेवा असून अशा उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपली जाते,” असे मत व्यक्त केले.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमाला श्री योगेश धुरी यांच्या सोबत माणगाव सरपंच सौ. मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, शिवसेना विभागप्रमुख श्री. एकनाथ धुरी, उपविभाग शैलेश विर्नोडकर, नानेली उपशाखाप्रमुख हेमंत घाडी, नानेली ग्रामपंचायत सदस्य श्री विनय कदम, बच्चू नाईक माणगाव ग्रामपंचायत सदस्य श्री. संदीप सावंत, सौ ईश्वरी सावंत, कु. तेजस्विनी नाईक, कु. अनुष्का तेली, आदी मान्यवर उपस्थित होते.


Subscribe










