वेंगुर्ला समुद्रात मच्छीमारी बोट बुडाली

दोघांना वाचवण्यात यश; एकजण बेपत्ता

बेपत्ता मच्छीमाराचा शोध सुरू

वेंगुर्ला : अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे शिरोडा-केरवाडी येथील मच्छिमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून, एक मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राजन सारंग (वय ४६, रा. केरवाडी) असे समुद्रात बेपत्ता झालेल्या मच्छिमाराचे नाव आहे.

शिरोडा केरवाडी येथील रहिवासी असलेले आणि एकाच कुटुंबातील व्यावसायिक मच्छिमार प्रकाश सारंग त्यांचा मुलगा दाजी सारंग आणि भाऊ राजन सारंग हे तिघे जण नेहमीप्रमाणे आज पहाटेच्या सुमारास आपली बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र, मासेमारी करत असतानाच अचानक समुद्रात सोसाट्याचा वारा सुटला आणि या वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे त्यांची मच्छिमारी बोट समुद्रात उलटली व बुडाली.

बोट बुडत असताना प्रकाश सारंग आणि त्यांचा मुलगा दाजी सारंग यांनी प्रसंगावधान राखत बोटीवर असणाऱ्या ऑईल टँकरचा आधार घेतला आणि ते तिथेच थांबून राहिले. सुदैवाने याच दरम्यान जवळून जाणाऱ्या दुसऱ्या एका मच्छिमारी होडीवरील सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने मदतकार्य करत प्रकाश सारंग आणि दाजी सारंग या पिता-पुत्राला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, ज्यामुळे या दोघां प्राण वाचवण्यात यश आले आहे.

परंतु, या दुर्घटनेत प्रकाश सारंग यांचे भाऊ राजन सारंग हे खोल समुद्रात बुडाले असून ते अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच केरवाडी येथील मच्छिमार सीआयटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बेपत्ता राजन सारंग यांचा समुद्रात युद्धपातळीवर शोध सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरोडा-केरवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!