कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक
विधानसभा निवडणुकीत माझ्या झालेल्या पराभवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातील जनता हळहळ व्यक्त करत आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर आरोप करत फेर मतमोजणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र मी तसे केले नाही माझा पराभव मी स्वीकारला असून त्याविषयी कोणाला दोष देणार नाही. ७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात मी काम करत राहणार आहे. माझ्या विरोधात निवडून आलेल्या उमेदवाराला मी तेव्हाच शुभेच्छा दिल्या. आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी विकास कामे करून दाखवावीत. हे करत असताना सत्ताधारी आणि अधिकारी यांनी एक लक्षात ठेवावे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून कामे केल्यास आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास त्याला आमचा विरोध राहील हजारो कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास आम्ही कमी पडणार नाही. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. आमदार असताना मी गेल्या दहा वर्षात सर्व सामान्य माणसासाठी काम केले.मी आता आमदार नाही त्यामुळे मला आमदार न म्हणता मला माझ्या नावाने हाक मारा.माझ्याबरोबर काही लोक शेवटपर्यंत थांबतील तर काही लोक साथ सोडतील मात्र शेवटचा नागरिक जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत काम करण्याचा निश्चय मी केला आहे.विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा विषय घेण्यात आला. मात्र पंधरा वर्षे भाजपची सत्ता आहे तरीही हिंदू खतरे में है अशी भूमिका घेऊन ते लोकांची फसवणूक करत आहेत. मात्र ही भूमिका जास्त काळ टिकणार नाही. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रात काम करायचे आहे. सत्ताधारी ज्या ज्या वेळी चुकतील त्या त्या वेळी आपण आवाज उठवला पाहिजे. लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे.आता विकास कामांची जबाबदारी आपल्यावर नसली तरी लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे. लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी शिवसैनिकांची साथ येणाऱ्या काळात मला लागणार आहे आणि सर्व शिवसैनिक मला साथ देतील असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला. काम करताना कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक भावुक झाले होते.
कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाली. देव दिपावली असून देखील या बैठकीला शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचा विश्वास शिवसैनिकांनी यामाध्यमातून दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,माजी जी. प. गटनेते नागेंद्र परब, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर शहरप्रमुख संतोष शिरसाट, जयभारत पालव,अतुल बंगे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, महीला आघाडी तालुका प्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, कुडाळ महीला शहर प्रमुख मेघा सुकी,युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, किरण शिंदे,अवधूत मालणकर,राजू गवंडे,उदय मांजरेकर,श्रेया गवंडे, तृप्ती वर्दम,ज्योती जळवी,सई काळप यांसह सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी,शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.