चक्क जन्मदात्या पित्याला मारहाण

दारूच्या नशेत बांबूच्या काठीने मारले

कणकवली तालुक्यातील घटना

कणकवली : तालुक्यातील सावडाव गावात दारूच्या नशेत मुलाने स्वतःच्या वडिलांना बांबूच्या काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित मुलाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशोक विठोबा वारंग (वय ६७, रा. सावडाव गावठाणवाडी, ता. कणकवली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मोठा मुलगा अभिषेक (वय ३५) याला दारूचे व्यसन असून तो वारंवार नशेत घरी येऊन कुटुंबियांना त्रास देत असतो. लग्नानंतरही त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो अधिक आक्रमक झाला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अभिषेक दारू पिऊन घरी आला. जेवणासाठी चिकन आणल्यानंतर त्याने अचानक शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर घरातील लाकडी दांड्याने वडिलांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण केली. यावेळी आई अर्चना यांनी मध्ये पडून वडिलांची सुटका केली.

या घटनेनंतर अभिषेकने “दोन दिवसांत तुम्हाला संपवतो” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जखमी अशोक वारंग यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतले.

दरम्यान, या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार सुधीर घारकर पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!