मुंबई – गोवा महामार्गावर दुचाकी व डंपर यांच्यात अपघात

पिंगुळी गुढीपूर येथील घटना

एकाच्या पायाला गंभीर दुखापत

तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

योगिता कानडे/कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे दुचाकी व डंपर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

मुंबई – गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून दुचाकीवरून दोघेजण कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. यावेळी पिंगुळी गुढीपूर येथे आले असता मागून येणाऱ्या डंपर चालकाने आपल्या ताब्यातील डंपर मुख्य रस्त्यावरून सर्विस रोडवर घेण्याच्या नादात दुचाकीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकीवरील दोघेजण महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या रेलिंगच्या वरून उंच उडाले आणि समोरून येणाऱ्या गाडीच्या बोनेटवर जाऊन आदळले. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी नागरिकांच्या सहाय्याने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!