स्फटिक शिवलिंगाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी एकजूट दाखवत पुकारला एल्गार

मालवण : तालुक्यातील सावरवाड – वराड येथे स्थापित करण्यात आलेल्या स्फटिक शिवलिंगाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी एकजूट दाखवत जोरदार एल्गार पुकारला. “सनातन संस्कृती आमची भक्ती आणि आमच्या वाडीची अस्मिता आहे. गावाचे नाव बदनाम करण्याचा कोणाचाही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा ठाम इशारा ग्रामस्थांनी सभेत दिला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव आणि अद्वितीय मानल्या जाणाऱ्या या स्फटिक शिवलिंगामुळे गावाची धार्मिक ओळख अधिक दृढ होत असून, उच्चशिक्षित युवकांच्या पुढाकारातून हे दैविक आणि सांस्कृतिक कार्य सुरू असल्याचा अभिमान वाडीवासीयांनी व्यक्त केला. स्फटिक शिवलिंगाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करत एकजुटीचे दर्शन घडविले.
या सभेला व्यासपीठावर यशस्वी उद्योजक बाळा चिंदरकर, जयेंद्रनाथ परब, महेश वालावलकर, नारायण चिंदरकर, ॲड. प्रदीप मिठबावकर, नंदन केसरकर, अजिंक्य पाताडे यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

युवा शिवसाधक समेश जाधव यांनी स्फटिक शिवलिंगाबाबत करण्यात येणाऱ्या अपप्रचाराचे पुराव्यानिशी खंडन केले, तर शिवसाधक चंद्रशेखर राणे यांनी या शिवलिंगाचा स्थापनेपासूनचा प्रवास आणि त्यामागील धार्मिक महत्त्व सविस्तरपणे ग्रामस्थांसमोर मांडले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ बांधवांनी मनोगत व्यक्त करत, “आमची वाडी, आमची संस्कृती आणि आमची सनातन परंपरा हीच आमची खरी अस्मिता आहे. रुद्रनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेले शिवकार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. काही संधीसाधूंकडून होत असलेल्या अपप्रचाराबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, मात्र गावाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे आवाहन केले.

दरम्यान, उद्योजक बाळासाहेब चिंदरकर यांनी आपल्या गावाशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करत, “गावातील वाद आता संपुष्टात यावेत. सर्वांनी गुण्यागोविंदाने एकमेकांचा आदर राखत पुढे जावे,” अशी भूमिका मांडली. तथापि, गावाचा अपप्रचार आणि अपमान सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महेश वालावलकर, नंदन केसरकर, नारायण चिंदरकर, अजिंक्य पाताडे, ॲड. प्रदीप मिठबावकर तसेच अंजुषा पिल्लई यांनीही आपली मते व्यक्त केली.

आगामी काळात स्फटिक शिवलिंग जगविख्यात होण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त करत, कोकणच्या समृद्ध संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रचार-प्रसार करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.

error: Content is protected !!