प्रवाशांच्या तक्रारींचे होणार निवारण
कणकवली प्रतिनिधी: एसटी महामंडळातर्फे प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी प्रवासीराजा दिन तसेच कामगार पालक दिन आयोजित केला आहे.
कधी असेल हा उपक्रम ?
डिसेंबर महिन्यात ६ ते ३० या कालावधीत आठही आगारांमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले आहे. एसटी महामंडळातर्फे १५ जुलैपासून प्रवासी राजा दिन आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगारस्तरावर या प्रवासी दिनामध्ये प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतल्या जातात. त्यानंतर सोडविण्यासाठी उपाययोजना केली जाते. प्रवासी दिन आणि कामगार पालक दिन डिसेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
कुठल्या आगारमध्ये कधी असेल कार्यक्रम?
वेंगुर्ले आगारांमध्ये ६ डिसेंबर, मालवण ९ डिसेंबर, सावंतवाडी १३ डिसेंबर, कणकवली १६ डिसेंबर, देवगड २० डिसेंबर, विजयदुर्ग २३ डिसेंबर, कुडाळ २७ डिसेंबर आणि वेंगुर्ला ३० डिसेंबरला हा उपक्रम असून, प्रत्येक आगारांमध्ये सकाळी दहा ते दोन या वेळेत हा उपक्रम होणार आहे. त्या उपक्रमामध्ये एसटीचे प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा महाविद्यालयातील समस्या, तक्रारी मांडून त्यांचे निरसन केले जाणार आहे. यात सहभाग घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग प्रल्हाद घुले यांनी केले आहे.













