साक्षात काळ समोर उभा होता!

बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग;

मळेवाड परिसरात भीतीचे वातावरण.

सावंतवाडी : मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त निरवडे येथे गेला होता. गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना घोडेमुख पायथ्याजवळील मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याची वाडी (खुळादेववाडी) परिसरात दबा धरून बसलेला बिबट्या त्याच्या नजरेस पडला. सुरुवातीला कुत्रा असावा, असा अंदाज घेत त्याने दुर्लक्ष केले. मात्र काही अंतरावर मागे वळून पाहिले असता बिबट्या चक्क दुचाकीचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्याने गाडीचा वेग वाढवून मळेवाड गाठले.

यानंतर सतीश नाईक यांनी घडलेली घटना ग्रामस्थांना सांगितली तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे सतीश नाईक हा युवक चांगलाच भांबावलेला दिसत होता.

सध्या भक्षाच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत असून पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनखात्याने या घटनेची तात्काळ दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!