‘नृत्याचा जल्लोष’ : ग्रामीण प्रतिभेला व्यासपीठ देणारा नृत्यकला डान्स अकॅडमीचा भव्य उत्सव

सलग दुसऱ्या वर्षी नृत्यकला डान्स फेस्टिव्हल २०२५ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

म्हापण : मराठी व हिंदी गाण्यांच्या तालावर सादर झालेल्या विविध, आकर्षक व भावस्पर्शी नृत्याविष्कारांनी म्हापण परिसर अक्षरशः नृत्यमय झाला. नृत्यकला डान्स अकॅडमीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘नृत्याचा जल्लोष – नृत्यकला डान्स फेस्टिव्हल २०२५’ या भव्य स्नेहसंमेलनात अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

पाट येथील आदिशक्ती मंगल कार्यालयात पार पडलेल्या या नृत्य महोत्सवात शास्त्रीय, लोकनृत्य, बॉलीवूड, फ्युजन अशा विविध नृत्यप्रकारांचे अप्रतिम सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक नृत्याविष्काराला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत होती. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण हालचाली, तालबद्धता व भावप्रदर्शन यामुळे कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली.

या नृत्य महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळचे संस्थापक व अध्यक्ष रवी कुडाळकर, कुडाळ नगरपालिकेचे नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, राकेश कांद, स्वाती पाटील, प्रसाद दाभोलकर, संतोष हळदणकर, केळुस सरपंच योगेश शेट्ये, प्रणाली मुळये, भारती फणसेकर, सलमान मेमन, निवेदक निलेश गुरव, शैलेश तांबे, निखिल कुडाळकर, संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. नृत्यकला डान्स अकॅडमी म्हापण येथील सर्व सहकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक विलास कुडाळकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नृत्यकला डान्स अकॅडमीला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. तर रवी कुडाळकर यांनी आपल्या वीस वर्षांच्या नृत्यप्रवासाची उजळणी करत, ग्रामीण भागातील मुला-मुलींना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना मिळावी, याच उद्देशाने अकॅडमीची स्थापना केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी नृत्य प्रशिक्षक निखिल कुडाळकर यांच्या मेहनतीचे, सातत्याचे व विद्यार्थ्यांवरील संस्कारांचे विशेष कौतुक केले.

या महोत्सवात अकॅडमीतील निधी केळुस्कर, युक्ती हळदणकर, वेदश्री दाभोलकर, सई राऊळ, सीमा चव्हाण, श्रीपाद म्हापणकर, विहान चव्हाण, लावण्या राऊळ, रिद्धी नार्वेकर, आर्या मरळ, काव्य देसाई या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर, भावपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण नृत्यसादरीकरण करून प्रेक्षकांची विशेष वाहवा मिळवली. या चिमुकल्या कलाकारांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंगतदार व संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक, उपस्थित मान्यवर तसेच रसिक प्रेक्षकांनी नृत्यकला डान्स अकॅडमीच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे भरभरून कौतुक केले.

error: Content is protected !!