मालवण प्रतिनिधी : जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत आज मालवण वायरी किनाऱ्यावरील ऐतिहासिक मोरयाचा धोंडा या ठिकाणी किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीचा ३६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोरयाचा धोंडा पाषाणावरील श्री गणेशाची पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात आले.मालवणच्या समुद्रातील कुरटे बेटावर किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी निश्चित केल्यानंतर १६६४ साली २५ नोव्हेंबर रोजी मालवण वायरी येथील एका पाषाणावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते श्री गणेशाचे (मोरयाचे) पूजन करून किल्ले सिंधुदुर्गच्या पायाभरणीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. तेव्हा पासून या पाषाणाला मोरयाचा धोंडा म्हणून संबोधले जाते. या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा वर्धापन दिन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व शिवप्रेमी यांच्या वतीने साजरा करण्यात येतो. यनिमित्त होणाऱ्या पूजेला शासकीय पूजेचा दर्जा प्राप्त आहे.यानिमित्त आज सकाळी मोरयाचा धोंडा येथे रविकिरण आपटे यांच्या पौरोहित्याखाली प्राध्यापक आर. एन. काटकर यांच्या हस्ते विधिवत गणेश पूजन करण्यात आले. तसेच मोरेश्वर चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. यावेळी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, दत्तात्रय नेरकर प्रदीप वेंगुर्लेकर दादा वेंगुर्लेकर, रत्नाकर कोळंबकर चिंतामणी तोरसकर रामगिरी बुवा. संतोष लुडबे, रविकिरण तोरसकर निखिल नेरकर मंजुश्री काटकर यांच्यासह शिवप्रेमी नाग पर्यटक उपस्थित होते.













