महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मुंबई : कोकणचे सुपुत्र पद्मश्री परशुराम गंगावणे यांना यावर्षीचा (२०२५) महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त करण्याचा बहुमान मिळाला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते आणि सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभूषण चवरे यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम & आर्ट गॅलरी यांच्या माध्यमातून ठाकर आदिवासी समाजातील पारंपरिक लोककला जपण्याचे आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य ते करत आहेत. ठाकर आदिवासी कला आंगण & आर्ट गॅलरीला देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. तसेच अनेक शैक्षणिक सहली व निवासी कार्यशाळा या ठिकाणी होतात. परशुराम गंगावणे यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी त्यांना व्यसनमुक्ती पुरस्कार, महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सिंधु पर्यटन मित्र पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता मिळालेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी समाजासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे.



Subscribe






