जमिनीच्या वादातून कोयता उगारला

वृद्धाच्या नाकाला दुखापत

एकावर गुन्हा दाखल

देवगड : कुणकेश्वर-वरचीवाडी येथे जमीन वादातून कोयता उगारत वृद्धावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकारात विलास दत्तात्रय कुळकर्णी (वय ७०) हे जखमी झाले असून त्यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. देवगड पोलिसांनी जयेश रवींद्र कांबळी (वय ३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विलास कुळकर्णी व जयेश कांबळी यांची शेजारील जमीन असून दोघांमध्ये यापूर्वीपासून वाद सुरू आहेत. कुळकर्णी यांनी आपल्या जागेतील साफसफाईसाठी काही झाडे तोडल्याचा राग कांबळी याला आला होता. त्यातूनच संतापलेल्या अवस्थेत तो कोयता हातात घेऊन अंगणात बसलेल्या विलास कुळकर्णी यांच्या दिशेने गेला.

या वेळी त्याने “झाडे का तोडली?” असा जाब विचारत थेट कुळकर्णी यांच्या भावावर—मनोज कुळकर्णी यांच्यावर—कोयता उगारला. मनोज यांनी प्रसंगावधान दाखवत त्याचा हात पकडला. त्यांना सोडविण्यासाठी विलास कुळकर्णी पुढे येताच संतापलेल्या जयेशने कोयता थेट वृद्ध विलास कुळकर्णी यांच्यावर उगारला. यामध्ये कोयता नाकाला लागून रक्तस्राव झाला.

घटनेनंतर विलास कुळकर्णी यांनी देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून जयेश कांबळीविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१), १३१ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल विनीता भुजे करीत आहेत.

error: Content is protected !!