आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का?
शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल
सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू वृत्तीने न स्वीकारता त्याचं खापर ईव्हीएम मशीन्सवर फोडताना दिसून येत आहेत. पराभव झालेल्या मतदार संघात ईव्हीएम मशिन्सवर खापर फोडणार मग विजय मिळालेल्या जागांचं काय? मग युवराज आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात, वरुण सरदेसाईंच्या वांद्रे (पूर्व) मतदार संघात व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माहीम विधान मतदार संघात निवडणूकीसाठीच्या ईव्हीएम मशीन्स मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का असा खोचक सवाल शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ईव्हीएम वरून टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांना विचारला आहे.जिल्ह्यातील जनतेने महायुती सरकारच्या कामगिरीवर मतदानातून आपल्या खुशीची मोहोर उमटवली आहे. युवावर्ग,लाडक्या बहिणी, शेतकरी व कामगार वर्ग भक्कमपणे सरकारच्या बाजूने उभा राहिल्यानेच महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. एकुणच उबाठा नेत्यांना आत्मपरीक्षणाची आवश्यकता असून त्यांनी जनमताचा आदर करून इव्हीएम वर खापर फोडणे थांबवावे असा सल्ला देखील प्रसाद गावडेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.