अपघातात तीव्र मार बसल्याने आला हृदयविकाराचा झटका
सावंतवाडी कोलगाव परिसरातील घटना
सावंतवाडी : कोलगाव परिसरातील रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात शहरातील ज्येष्ठ सायकलपटू नजीर शहा (७०) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नजीर शहा हे दररोजप्रमाणे सायकलिंगसाठी बाहेर पडले होते. कोलगाव रस्त्यावर खोल खड्ड्यात सायकल घसरून ते जोरात पडले. या धडकेत त्यांना तीव्र मार बसला आणि त्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.
या मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून आकेरीचा चढाव ते कोलगाव तिठा या पट्ट्यात अनेक वर्षांपासून मोठमोठे खड्डे कायम आहेत. याच खड्ड्यांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली. नागरिक दहशतीत प्रवास करत असून प्रशासनाकडून कोणतीच ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
नजीर शहा यांच्या मृत्यूनंतर संताप व्यक्त करत जाधव यांनी निवडणूक संपताच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“एका निरपराध वृद्धाचे प्राण गेले… अजून किती बळींची वाट प्रशासन पाहत आहे?” असा तीव्र सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


Subscribe





