वनविभागाच्या उपस्थितीत झाली मारहाण
प्राणीप्रेमींमध्ये संताप!
सावंतवाडी : ‘ओंकार’ नावाच्या हत्तीला दांड्याने मारहाण करून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, जनतेतून वनविभागाच्या कार्यप्रणालीवर आणि संबंधितांवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांसमोर घडल्याचा आरोप आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ‘ओंकार’ हत्ती आपल्या कळपापासून वेगळा राहून गोव्यानंतर आता सिंधुदुर्ग परिसरात स्थिरावला आहे. त्याने परिसरातील भातशेती आणि बागांचे काही प्रमाणात नुकसान केले असले तरी, त्याच्यावर अशा प्रकारे अत्याचार करणे अमानवी असल्याचे नागरिकांचे मत आहे.
वनविभागाच्या उपस्थितीत झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्राणीमित्रांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तिलारी खोऱ्यात ‘ओंकार’ला देवाचे रूप मानले जात असताना, त्याच हत्तीवर अशा प्रकारे मारहाण होणे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचे प्राणीप्रेमी तुषार देसाई यांनी सांगितले.
त्यांनी पुढे सांगितले की, वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ नुसार हत्ती हा अनुसूची १ मधील संरक्षित प्राणी आहे. तसेच हत्ती संरक्षण कायदा, १८७९ आणि प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० नुसार कोणत्याही प्राण्याला त्रास देणे, मारहाण करणे, किंवा वेदना देणे हा दंडनीय गुन्हा आहे.
या पार्श्वभूमीवर, ओंकार हत्तीला अनावश्यक त्रास देणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करून वनविभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी प्राणीमित्र तुषार देसाई यांनी केली आहे.


Subscribe





