जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रभागनीय आरक्षण आज जाहीर झाले आणि सगळ्यांची उत्कंठा शांत झाली. आजचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना पुन्हा संधी मिळणार आहे. तर, अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात नेमकं कोण उतरणार ? निवडणूक ही महायुती म्हणून लढवली जाणार की स्वबळावर ? असे एक ना अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. याबाबतच्या अनेक खुसखुशीत चर्चा सध्या नाक्या – नाक्यावर रंगू लागल्या आहेत. अशातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे…
कुडाळ तालुक्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे पावशी मतदार संघ… हा मतदारसंघ शिवसेनेचे जिल्हा सचिव दादा साईल यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पावशी मतदार संघातून दादा साईल यांचे नाव जोरदार चर्चेत आहे.
दादा साईल हे आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. शिवाय पणदूर गावचे ते माजी सरपंच असून जिल्ह्यात त्यांची ‘स्मार्ट सरपंच’ अशी ओळख आहे. सरपंच असताना त्यांनी गावात अनेक विकास योजना राबविल्या आहेत. त्यांच्या काळात ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवातच मुळात ग्रामीण भागातून झाल्यामुळे तळागाळात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे शिवसेनेचा अभ्यासू आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांचा फोटो व नावाचा उल्लेख असलेले पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच या पोस्टरमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे देखील चित्र आहे. अर्थातच जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शिवसेनेचा आश्वासक चेहरा” दादा साईल यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे.
राजकारणात असलेला १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, प्रशासनाचा गाढा अभ्यास, प्रभावशाली वक्तृत्व या गुणांमुळे सिंधुदुर्गातील शिवसेनेचे एक उगवते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच दादा साईल हे जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.


Subscribe









