रिक्षाचालक फरार
फरार होताना रिक्षा सीसीटीव्हीत कैद
कुडाळ : कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत युवतीने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून संबंधित रिक्षाचालकाचा कसून शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर युवती कुडाळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे. सायंकाळी ही युवती आपले काम आटोपून घरी परतत असताना एका अनोळखी रिक्षाचालकाने तिच्या समोर येऊन रिक्षा थांबवली. कोणाला काही कळायच्या आत त्या रिक्षाचालकाने युवतीचा हात पकडून रिक्षामध्ये जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला. अचानक अशी घटना घडतच युवती घाबरली. परंतु, प्रसंगावधान राखत तिने आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून लोक त्या ठिकाणी जमा होतील आणि आपले बिंग फुटेल या भीतीने रिक्षाचालकाने त्या ठिकाणाहून पोबारा केला. यावेळी संबंधित रिक्षा त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली.
ही घटना घडताच संबंधित युवतीने तडक कुडाळ पोलीस स्थानक गाठत या घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी या अज्ञात रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. परंतु सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ फारच अस्पष्ट आहे. त्यामुळे संबंधित रिक्षाचालकाबाबत माहिती मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान कुडाळ पोलिसांसमोर उभे राहिले आहे. कुडाळ सारख्या गजबजलेल्या शहरात अशी घटना घडल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


Subscribe










