दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल
कणकवली : तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चैतन्य मनोहर नाईक (वय 23, राह. हळवल परबवाडी, ता. कणकवली) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते कामगाराला सोडून परत घरी येत असताना हडी फाट्याजवळ त्यांनी जनावरांनी भरलेला एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो कनेडीच्या दिशेने जाताना पाहिला. तत्काळ त्यांनी मित्राला माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांच्या सहकार्याने हा टेम्पो कनेडी बाजारपेठ फोडाघाट रस्त्यावर पकडण्यात आला.
पकडलेल्या टेम्पोचा क्रमांक MH 09 CU 5204 असून, त्यात एक गाय, एक म्हैस आणि तिचे वासरू अशा तीन जनावरांची निर्दयपणे, विनापरवाना व दाटीवाटीने वाहतूक केली जात होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहन जप्त केले आहे.
या प्रकरणी टेम्पो चालक विजय बाजीराव चौगले (वय 43, रा. थडयाचीवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि त्याच्यासोबत असलेला अंकुश तातोबा चौगले (वय 43, रा. थडयाचीवाडी) यांच्याविरुद्ध पशु संरक्षण कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी अविनाश चव्हाण, साहिल शंकरदास, निशू कडुलकर, अमित पुजारे, अतिश कांदळकर, यश सावंत, पराग सावंत आदी कार्यकर्ते पोलीस ठाण्यात उपस्थित होते. कणकवली पोलीस ठाण्याचे पोउपनि. महेश शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.














 
	

 Subscribe
Subscribe









