महापुरुष लिंगदेवता भजनमंडळ जपतेय २५ वर्षांची परंपरा

मित्रहो कोकण म्हणजे संस्कृती आणि परंपरांचे जणू माहेरघर… या ठिकाणी आपल्याला विविध रूढी – परंपरांचे दर्शन होते. कोकणातील गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध आहे. असं म्हणतात, सिंहाला पहावं वनात… हत्तीला पहावं पाण्यात… तर गणेशोत्सव पहावा कोकणात… गणेशोत्सव काळात हे कोकण संस्कृतीच्या विविध रंगांनी न्हाऊन निघते. घराघरात भजन करून बाप्पाला आळविले जाते. यावेळी पेटी, टाळ आणि मृदुंग यातून उमटणारे नादमधुर स्वर कानातून थेट हृदयात उतरतात. पाऊले संमोहित होऊन आपोआप आवाजाच्या दिशेने चालू लागतात. कोकणात या भजन संस्कृतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोकणात गावोगावी अशी भजन मंडळे आहेत जी गेली अनेक वर्षे अविरतपणे भजन संस्कृती जपत आहेत. कुडाळ तालुक्यात असेच एक भजन मंडळ आहे ज्याचे नाव आहे “महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ, पिंगुळी”

या मंडळाला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. गेली २५ वर्षे हे मंडळ भजन सेवा जपत आहे. खास गणेशोत्सवासाठी या मंडळाचे सदस्य असणारे मुंबईतील चाकरमानी येत असतात. या मंडळाची आताची नवी पिढी देखील आपली संस्कृती टिकवून आहे. या मंडळाचे सर्व सदस्य माळेतील मोत्यांप्रमाणे एकमेकांशी घट्ट गुंफले गेले आहेत. सर्व सदस्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे महापुरुष लिंगदेवता भजन मंडळाची परंपरा अविरत टिकून राहील असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष कांता मुंडीये यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!